न घेतलेल्या मुलाखती
विक्रम महिमानगडकर
ती तर म्हणते, ती मेलेलीच नाही
सध्या ज्या विषयावरून आज वादळ देशभर घोंगावते आहे, त्या दिल्लीतल्या बलात्कारितेला कोणाला भेटू दिले जात नव्हते. त्यामुळे कुठल्याच वाहिनी वा वृत्तपत्राला या संपुर्ण प्रकरणात तिचे मत वा भूमिका काय आहे, त्याचा छडा लागला नाही. एकच बातमी तिच्या शुद्धीवर येण्याचा हवाला देऊन आलेली आठवते, तिने डोळे उघडताच विचारले, ‘त्या गुन्हेगारांना पकडले का?’ जणू शेवटची इच्छा असल्यासारखे बोलून ती गप्प झाली, त्यानंतर तिच्याकडून काही ऐकायला मिळालेले नाही. बाकी्चा जो दोन आठवडे कल्लोळ चालू आहे त्या दंतकथा आहेत. कोणीही मनात येईल ते आणि आपल्याला वाटेल ते बरळतो आहे. ज्या घटनेने आणि ज्या मुलीमुळे देशात इतका गाजावाजा झाला; तिचे मत कसे समोर यायचे? कोणी तरी तिची मुलाखत घ्यायला नको का? तिचीही बाजू आहे आणि ती जगासमोर यालला हवी. त्या बलात्कारातल्या एक आरोपीने स्वत:ला फ़ाशी द्यावे, असेही सांगून टाकले आहे; तर मुख्य आरोपीने मुलीने प्रतिकार केल्याने प्रकरण विकोपास गेल्याचा दावा केला आहे. पण त्या मुलीची बाजू काय आहे? इतकी गोपनियता राखली गेली आहे, की आता ती मरण पावली यावर तरी किती विश्वास ठेवायचा? निदान माझा तरी त्या मृत्यूवर विश्वास नाही. म्हणूनच मी तिला सगळ्यांचा डो्ळा चुकवून गाठले आणि तिची मुलाखत मनातल्या मनात उरकून टाकली. आता तिचे नाव गोपनिय राखायचे असल्याने इथे सोयीसाठी तिला अनामिका म्हणूया.
प्रश्न- सलाम अनामिका, सलाम.
अनामिका- बोला, काय विशेष?
प्रश्न- तुझ्या मृत्यूची बातमी सगळीकडे गाजते आहे, म्हणून म्हटले तुझ्याकडून खात्री करून घेऊ.
अनामिका- माझ्या मृत्यूची बातमी? कोणी दिली? या मीडियाला वेड लागले आहे. काहीही थापा मारतात. एकालाही अक्कल नाही. मी कशाला मरते? चांगली ठणठणीत आहे मी.
प्रश्न- पण तुझ्यावर उपचार चालू होते, तुला वाचवायचे आटोकाट प्रयास डॉक्टर करीत होते?
अनामिका- ते खरेच आहे. माझ्यावर उपचार करणे भागच होते. एवढी मोठी झुंज दिली; मग थोड्याफ़ार जखमा व्हायच्याच ना? मलमपट्ट्या वगैरे कराव्या लागणारच ना?
प्रश्न- मलमपट्ट्या? आम्ही तर ऐकले तुझी मृत्यूशी झुंज चालू होती?
अनामिका- खरे आहे ते. पण ती झुंज इस्पितळात नव्हे; दिल्लीच्या हमरस्त्यावर धावणार्या बसमध्ये चालू होती आणि तेव्हा मला एकटीलाच लढावे लागले मृत्यूशी. कुठला डॉक्टर वगैरे नव्हता माझ्या सोबत.
प्रश्न- मृत्यूशी झुंज? धावत्या बसमध्ये? आम्ही तर ऐकले, की बसमध्ये तुझ्यावर बलात्कार झाला?
अनामिका- मिस्टर, जो निमुटपणे सहन केला जातो त्याला बलात्कार म्हणतात. मी गुपचुप सहन केला नाही तो हल्ला. मी झुंज दिली स्वत:ला वाचवण्यासाठी. माझी इज्जत सुरक्षित राखण्यासाठी झुंजले मी. शरण नाही गेले, त्या सैतानांना किंवा माझा आत्मसन्मान नाही मरू दिला. त्याच्यासाठीच झुंजले मी. देह काय साधी गोष्ट असते. आत्मसन्मान म्हणजे माणुस असतो. मग तो पुरूष असो की स्त्री असो.
प्रश्न- म्हणजे तुझ्यावर झाला तो बलात्कार नाही असे म्हणा्यचे आहे काय तुला?
अनामिका- अजिबात नाही. माझ्या स्त्रीदेहावर लैंगिक हल्ला झाला होता आणि त्यापासून माझा एक नागरिक म्हणुन बचाव करणे; ही पोलिसांची व सरकारची जबाबदारी होती. ती त्यांनी पार पाडली नसेल तर त्यांच्यावर बलात्कार झाला म्हणा. माझ्यावर नव्हे. सरकार आणि पोलिसांचे बळ तोकडे लुळे पडले, तर जो शिरजोर झाला; त्याने त्यांच्यावर बलात्कार केला. माझ्यावर नव्हे.
प्रश्न- तुझ्यावर आणि तुझ्या देहावर यात फ़रक काय पडतो? बलात्कार तो बलात्कारच ना?
अनामिका- खुप मोठा फ़रक आहे. मी म्हणजे माझा व्यक्ती म्हणून असलेला आत्मसन्मान असतो, त्याचा बचाव किंवा रक्षण सरकार नाही करू शकत. ते संरक्षण माझे मलाच करावे लागते. माझ्या देहाच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असते, पोलिसांची असते. मी त्यासाठी कधीच सरकारवर अवलंबून नव्हते. म्हणूनच माझी अब्रू राखायला पोलिस येतील वा कायदा काय म्हणतो, त्याची पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांप्रमाणे मी वाट बघत बसले नाही. मी माझ्या आत्मसन्मानाचा प्राणपणाने बचाव केला. शरीराला होणार्या वेदना, जखमांची पर्वा केली नाही. ती माझी जबाबदारी नव्हतीच. ज्यांची होती ते सरकार व पोलिस नामर्द असतील तर त्याला मी काय करू?
प्रश्न- म्हणजे याचा अर्थ काय अनामिका? सगळे जग म्हणते आहे, की तु बलात्काराची बळी आहेस आणि त्यातच तुझा म्रूत्यू झाला. मग तुच त्याचा इन्कार कसा करते आहेस?
अनामिका- कारण जे असे बोलत आहेत, त्यांना काय झाले वा काय होते आहे त्याचाच थांगपत्ता लागलेला नाही. इथे बलात्कार स्त्रीवर होत नसतो. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे ना? देशाची राज्यघटना आहे ना? त्यानुसार चालणारी संसद आणि तिला जबाबदार असलेले सरकार आहे ना? मग त्या राज्यात बलात्काराची कोणाला मोकळीक असते का? कायदा ती मोकळीक देतो का? नसेल तर बलात्कार होऊच कसा शकतो? व्यक्तीवर होत असेल तर तो व्यक्तीगत हल्ला असतो. पण असा हल्ला हे त्या प्रस्थापित कायद्याच्या, घटनेच्या, संसदे्च्या आणि सत्तेच्या बळाला दिलेले आव्हान असते. त्यात जो आव्हान देतो, तो बळाने मात करीत असेल; तर तो बलात्कार असतो कायद्यावरचा. म्हणून बलात्कार झाला तो माझ्यावर नाही.
प्रश्न- कमाल आहे तुझी अनामिका. इतका लढा देऊनही तू इतकी बिनधास्त आहेस?
अनामिक- का असू नये? मी त्या हल्लेखोरांचा तुल्यबळ सामना केला. मला लाज वाटायचे काय कारण आहे? ज्यांच्यावर बलात्कार झाला त्यांना शरम वाटावी. जे नामर्द ठरलेत, त्यांनी माना खाली घालाव्यात. कारण हल्लेखोरांनी माझ्यावर शारिरीक हल्ला केला. तो प्रत्यक्षात कायद्याचे राखणदार व पोलिस, सरकार यांच्यावरचा बलात्कार आहे. त्यात मेले असेल तर सरकार मेले आहे. मारला गेला असेल तर कायदा मारला गेला आहे. बळी पडला असेल तर न्यायाचा बळी पडला आहे. माझ्या आत्मसन्माला धक्काही लागलेला नाही. तो अत्यंत सुरक्षित आहे. कारण माझ्या आत्मसन्मानावरून मी जीव ओवाळून टाकला आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे.
प्रश्न- व्वा, अनामिका. सलाम तुझ्या धाडसाला. शौर्याला.
अनामिका- माझ्याच कशाला? या देशातल्या कुठल्याही मुलीच्या अंगात तेवढीच हिंमत व आत्मसन्मान आहे. त्यांना सलाम करा, त्यांचा गौरव करा. तसा प्रसंग आला तर त्याही अशाच झुंजतील. कारण या देशात आता आपले सरकार, राज्यकर्ते व कायद्याचे अंमलदार बलात्कारित म्हणून शरमेने मान गुडघ्यात घालून बसलेत. प्रत्येक महिलेला व मुलीला आता आपल्या देहावर होणार्या हल्ल्याची पर्वा न करता; स्वत:च्या आत्मसन्मानासाठी म्हणजे अब्रुसाठी झुंज द्यावी लागणार आहे. त्याचे त्या प्रत्येक मुलीला माझ्या अनुभवानंतर भान आले आणि त्यांनी रस्त्यावर उतरून त्याची साक्ष दिलीच ना? मग त्यांच्या शौर्य व हिंमतीला तुम्ही लोक दाद का देत नाही?
प्रश्न- म्हणजे कायदा व सरकार महिलांच्या अब्रूचे रक्षण करू शकत नाही असा आरोप आहे तुझा?
अनामिका- आरोप? काय बघितलेत दोन आठवड्यात? तुमचे डोळे. मेंदू तुम्हाला काही सांगत नाही? माझ्यावरच्या हल्लेखोरांचा बंदोबस्त करायचे सोडून पोलिस व सरकार काय करत होते? ज्यांच्यावर, म्हणजे ज्या सरकार, कायदा, न्यायावर त्या हल्लेखोरांनी त्या रात्री धावत्या बसमध्ये बलात्कार केला; त्याचा निषेध करायला तरूण मुली, महिला व जनता रस्त्यावर उतरली, तेव्हा त्यांची मुस्कटदाबी करायला कोण पुढे सरसावले होते? तेच बलात्कारित पोलिस व सरकारच आले ना पुढे?
प्रश्न- म्हणजे?
अनामिका- होय, बलात्कार मझ्यावर झालेला नाही, कायद्याच्या राज्यावर बलात्कार झाला आहे. पण त्याचा निषेध करायचीही सरकारला भिती वाटते आहे. असे सरकार वा कायदा कोणाचे संरक्षण करणार आहे? हे ओळखूनच त्या मुले मुली रस्त्यावर उतरल्या होत्या. हल्लेखोर बलात्कार्यांना खुले आव्हान द्यायला. आणि सरकार व पोलिस काय म्हणत होते? शांततेने घ्या. काय घ्या शांततेने? बलात्कार शांततेने घ्यायचा असतो? मला नुसती शक्यता दिसली तर मी त्या हल्लेखोरांवर प्रतिहल्ला चढवला होता. आणि ज्यांच्यावर उघड बलात्कार झाला तो कायदा व सरकार मात्र शांततेने घ्या म्हणते?
प्रश्न- थोडा नजूक प्रश्न आहे. तू म्हणतेस तुझा मृत्यू झालेलाच नाही. मग तुझा मृतदेह आणला जाणार आहे त्याचे काय?
अनामिका- तो माझा देह मरण पावला असेल. पण मी व्यक्ती वा नागरिक म्हणून माझा आत्मसन्मान असतो तो चांगला ठणठणीत आहे. सुखरूप आहे. नुसता जिवंत, ज्वलंतच नाही तर करोडो भारतीयांना संजीवनी देतो आहे. कित्येक वर्षे मरून पडलेल्या आत्मसंन्मानाला मी जिवंत केले असेल; तर मी मरण पावले ही अफ़वाच नाही काय? देशाच्या गृहमंत्र्यांना, पंतप्रधानांना ते मुलींचे बाप आहेत याचा विसर पडला होता, त्याची आठवण मी करून दिली, तो मरणाचा पुरावा आहे, की माझ्या जिवंतपणाचा?
प्रश्न- मग मृतदेह कोणाचा आणला जातोय? अंत्ययात्रा कोणाची काढली जाणार आहे?
अनामिका- सरकारची, कायद्याची, न्यायाची, ज्यांच्यावर बलात्कार झाला आणि त्याच जखमांनी त्यांचा मृत्यू झाला; त्यांची आता शाही इतमामाने अंत्ययात्रा काढली जाईल. अंत्यसंस्कार केले जातील. त्यानंतर आपल्या अब्रू व आत्मसन्मानासाठी नागरिकांच सज्ज रहायचे आहे; याचे भान आल्यानेच करोडो भारतीय रस्त्यावर उतरले आहेत. ज्याने त्या करोडो मृतवत भारतीयांचा आत्मसन्मान जिवंत केला; ती मेली यावर कोण विश्वास ठेवील का?
(दैनिक ‘आपलं महानगर’ रविवार ३० डिसेंबर २०१२)