रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

स्मारकाबद्दल मुंबईला काय वाटते?

पण ज्या मुंबईवर बाळासाहेबांनी जीवापाड प्रेम केले, त्या मुंबईला काय वाटत असेल त्यांच्या स्मारकाबद्दल? ‘आपलं महानगर’ या मुंबईच्या दैनिकात एक उत्तम लेख आलाय त्यावर. मला वाटते, तेवढी सुंदर व चिंतनिय प्रतिक्रिया अन्य कोणाची नसेल.





मुंबईला काय वाटते?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्वाणाला आता आठवड्याचा कालावधी लोटला आहे. त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहून माघारी जाताना जे दृष्य़ अमिताभ बच्चनला दिसले, त्यावर त्याने अतिशय मार्मिक भाष्य़ ट्विटरवरून केले होते. वाटेत एका जागी मोठा फ़लक त्याने पाहिला; त्यावर साहेबांचा उल्लेख ‘स्वर्गिय बाळासाहेब’ असा होता आणि असे शब्द कधीकाळी वाचायची वेळ येईल असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया त्याने नोंदवली आहे. आज बाळासाहेब नाहीत हे वास्तव मानायला अमिताभचे मन तयार नाही, असेच त्याला सांगायचे आहे. पण दुसरीकडे बघा, त्याच्य़ावर आपलीच निष्ठा व प्रेम अधिक होते; असे दाखवणार्‍यांची कशी जीवघेणी स्पर्धा चालू झाली आहे. दिवंगत बाळासाहेबांचे स्मारक हा विषय आता विनाविलंब वादाचा बनवण्यात आला आहे. कोणी इंदू मिलची जागा स्मारकाला मिळावी असे म्हटले आहे; तर कोणी शिवाजी पार्कवरच त्यांचे स्मारक व्हावे अशी सूचना केली आहे. कोणाला दादर रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्याची इच्छा झाली आहे. अशा मागण्या सामान्य माणसाला भुरळ घालणार्‍या जरूर असतात. पण त्या मागण्या ठासून करणार्‍यांची मानसिकता चटकन आपल्या लक्षात येणारी नसते. इथेच बघा ना, अमिताभने कधी अशा बाळासाहेबांवरच्या आपल्या प्रेमाचे प्रदर्शन मांडलेले नाही. पण मोजक्या शब्दातून त्याच्या अनिवार वेदनेचा अविष्कार झाला आहे. जो माणूस गेला, त्याच्या मृत्यूचे वास्तव स्विकारणे अमिताभला अवघड जाते आहे. आणि दुसरीकडे त्याच दिवंगत बाळासाहेबांना स्मरणात ढकलण्याची स्पर्धा चालली आहे. जे कोणी हे निष्ठावंत आहेत, त्यांना साहेबांच्या देहांताचे खरेच दु:ख झाले आहे काय? मग स्मारकात त्यांना बदिस्त करण्याची घाई कशाला? अशा वादात अन्य कोणाशी बोलण्यापेक्षा ज्या मुंबईवर बाळासाहेबांनी अतोनात प्रेम केले व तिच्या मराठीपणासाठी सतत आवाज उठवला; त्या मुंबईला आपला हा सुपुत्र गमावल्याचे किती दु:ख झाले ते मला जाणून घ्यावे अशी इच्छा झाली. म्हणून गेला आठवडभर मुंबईला शोधत मुंबईभर फ़िरत होतो.

शेवटी ती मुंबई मला एका संध्याकाळी शिवाजी पार्कच्या कट्ट्याजवळ महाराजांच्या पुतळ्याखाली गुडघ्यात मान घालून बसलेली सापडली. कितीवेळ तिला बोलती करण्यात गेला कोण जाणे? त्या मुंबईच्या तोंडून शब्द फ़ुटत नव्हता. अवघी माध्यमे, वाहिन्या ज्या निधनाचा गदारोळ करत होत्या, मिळेल त्याच्या प्रतिक्रिया घेत होत्या, त्याबद्दल ही मुंबई मात्र अवाक होती, नि:शब्द होती, स्तब्ध होती. येणार्‍याजाणार्‍याचे लक्ष आपल्याकडे जाऊ नये याची काळजी घेत एकटीच आपले दु:ख व्यक्त करत तिथे बसली होती. तिच्या तोंडात शब्द नव्हता; पण डोळे अश्रूंनी डबडबले होते. मला जवळ येताना पाहून मुंबई दचकली, तिने अंग चोरून घेतले. आपण इथे दु:ख व्यक्त करायला आलो; हे कोणाला समजल्याची असहायता तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. पण कुणाला सांगण्यासाठी वा छापण्यासाठी आलेलो नाही, असे वचन दिल्यावर मुंबई सावरली आणि पदराने तिने डोळे पुसले. मग मी बोलायला सुरूवात केली. तिची विचारपूस केली, तेव्हा तिची खरी वेदना उघड झाली. म्हणाली, ‘किती निर्दय झालाय रे माणूस? माझा सुपुत्र गेलाय जीवनातून उठून आणि यांना स्मारकाचे डोहाळे लागलेत. या माझ्या शरीरावर मुंबईभर काय कमी स्मारके आहेत? कोणी कधी मला हवे नको विचारले का, अशा स्मारकाबद्दल? माझ्या या बाळालाही त्याच अनेक स्मारकांच्या रांगेत नेऊन बसवायला निघालेत.’ मोठी अजब कहाणी होती मुंबईच्या तोंडून ऐकलेली. पण निदान मुंबई बोलू लागली होती

प्रश्न- म्हणजे तुला इथे बाळासाहेबांचे स्मारक व्हावे असे वाटत नाही?
मुंबई- स्मारक म्हणजे काय असते? एक पुतळा? एक भव्य इमारत? कुठल्या रस्त्याला वा वास्तूला नाव देऊन स्मारक होते?
प्रश्न- पण बाळासाहेब खुप मोठे होते आणि म्हणूनच त्यांच्या स्मारकाची मागणी होतेय.
मुंबई- काय विटंबना आहे ही. एका बाजूला खुप मोठे होते म्हणता आणि दुसरीकडे इवल्या स्मारकाच्या गप्पा करता?
प्रश्न- इवले कुठे? भव्यदिव्य स्मारकाची मागणी आहे. त्यासाठीच कोणी शिवाजीपार्क म्हणतोय तर कोणी इंदू मिलची जागा मागतोय.
मुंबई- कशाला भव्य म्हणता? जागेच्या तुकड्याला की त्यावर उभ्या राहिलेल्या इमारतींना भव्य मानता? त्यातून स्मारक होते कारे? त्या भायखळ्याच्या दोन पुलांच्या कैचीत सापडलेल्या खांबावरच्या पुतळ्याचे नाव मला सांगशील? पुर्वी त्याला खडा पारशी म्हणायचे. तेही स्मारकच आहे ना? कोण तो आणि कशाला त्याचे स्मारक उभे केले तिथे? कोणी सांगू शकेल आज? बाळासाहेबाचे तसे स्मारक करणार आहात काय? ज्या रस्त्याने गेल्या रविवारी जनसागर उसळला होता, ती लेडी जमशेदजी कोण सांगता येईल तुला? कसली स्मारके करता रे?
प्रश्न- पण एवढ्या मोठ्या महान व्यक्तीमत्वाला विसरून जायचे?
मुंबई- कोण म्हणतो विसरून जायचे? छत्रपती शिवाजी महाराजांना इहलोक सोडून किती शतके लोटली? विसरून गेले कारे जग त्यांना? आज जागोजागी पुतळे दिसतात त्यांचे? कधी आले हे पुतळ्यांचे पीक? शंभर वर्षातला तर मामला आहे ना? मग मधली अडिचशे वर्षे काय शिवरायांना विसरलो होतो आपण? नसू तर का नाही विसरलो? तो तर युगपुरूष होता. विसरला कोण त्यांना? स्मारक त्यांचे करावे लागते; ज्यांची जगाला ओळखच नसते. याच मुंबईत अनेक जुन्या नावाजलेल्या शिक्षण संस्था शेठजींची स्मारके म्हणुन कित्येक वर्षे उभ्या आहेत. रुईया, रुपारेल, झुनझुनवाला, सोमाणी, छबीलदास हे महानुभाव नेमके कोण होते सांगशील जरा?
प्रश्न- खरेच ठाऊक नाहीत मला.
मुंबई- त्यांची नावे आजही घेतली जातात. पण त्या नावांचा रोजच्या रोज उच्चार करणार्‍या हजारो मुलांना विद्यार्थ्यांना ते कोण तेही ठाऊक नसते. त्याला स्मारक म्हणतात. जपमाळ ओढल्यासारखी जी नावे घेतली जातात, पण ज्यात भावनेचा, भक्तीचा लवलेश नसतो, त्याला स्मारक म्हणतात. बाळासाहेब इतका अनोळखी होता कायरे या मुंबई-महाराष्ट्राला, की त्याचे स्मारक करायला हवे?
प्रश्न- मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल काय म्हणशील?
मुंबई- त्यांचे काय? रस्त्याला नाव दिले किंवा कुठे पुतळे उभे केले; म्हणुन बाबासाहेब मोठा माणूस झाला आहे काय? त्या महामानवाची आठवण करोडो लोकांच्या मनात आहे, ती काय या स्मारक किंवा पुतळ्यामुळे आहे? अरे जेवढ्या लोकांना बाबासाहेबांच्या हयातीत ते माहीत नसतील त्यापेक्षा शेकडो पटीने आज त्यांचे नाव लोक उच्चारतात, ते त्या पुतळ्यामुळे नाही, तर त्या महामानवाच्या महान कर्तृत्वामुळे.
प्रश्न- म्हणजे स्मारकाची गरजच नसते?
मुंबई- ज्यांना लोक ओळखत नसतात व ज्यांनी आपल्या कर्तृत्वाची जनमानसावर छाप पाडलेली नसते ना; त्यांची स्मारके करावी लागतात. बाबासाहेब वगैरे असे महामानव आपल्या कर्तबगारीची अशी छाप जगावर सोडून जातात, की ती पुसणेच अशक्य असते. त्यांची कर्तबगारी हेच त्याचे जिवंतपणी त्यांनीच उभारलेले स्मारक असते. ते पुसायला धडपडणारे त्यांचे शत्रू नामशेष होतात, पण ही मोठी माणसे आपल्या स्मरणाच्या अमरत्वाने मरणावरही मात करून जातात. बाबासाहेब, बाळासाहेब, लोकमान्य, गांधीजी अशी माणसे स्मारकाची गरजवंत नसतात. सदोबा पाटिल आठवतो तुला?
प्रश्न- कोण बुवा?
मुंबई- चर्नी रोडच्या उद्यानात कोपर्‍यात एकाकी उभा एक पुतळा आहे ना; तोच आहे सदोबा. त्याने अर्धशतकापुर्वी बाबासाहेबांच्या स्मारकाला जागा देण्याचे सर्व प्रयास हाणून पाडले. तो स्वत:ला मुंबईला सम्राट म्हणवून घ्यायचा. आणि अवघ्या दोन दशकात त्याचे नाव कुणाला आठवत नाही. म्हणून बाबासाहेबांचे विस्मरण झाले कारे कुणाला? त्यांच्या निर्वाणाला आता अर्धशतकाचा कालावधी लोटला आहे. तिसरी पिढी जन्माला आली आहे. त्या पिढीच्या स्मरणात बाबासाहेब कशामुळे आहेत? स्मारकांमुळे की पुतळ्यामुळे?
प्रश्न- त्यांनी दलित व भारतीय समाजासाठी केलेल्या कार्यामुळे.
मुंबई- कार्य नव्हे कर्तृत्वामुळे. अशा कर्तबगार माणसांचे प्रकाशमान जीवनच त्यांचे कायमचे स्मारक असते. त्यांचे त्या त्या शहर, गाव भूभागातले वास्तव्य हेच त्यांचे स्मारक असते. त्यांचे कार्य व विचार पुढे घेऊन जाण्यात खरे स्मारक असते. स्मारक वा पुतळ्याच्या उंचीपेक्षाही प्रचंड उंची असलेल्या कर्तृत्वाची ही अलौकीक माणसे ज्या माझ्या अंगाखांद्यावर उठली, बसली, वागली व जगली त्या भूमीला मुंबई म्हणतात. मग मी मुंबई हेच त्यांचे जितेजागते स्मारक नाही काय? जोवर माझे अस्तित्व आहे; तोवर असे माझे लाडके सुपुत्र अजरामर आहेत. मला त्यांना विसरणे कोणाला शक्य नाही, की माझ्या कुशीत जो कोणी आसरा घ्यायला येईल, त्याला त्या सुपुत्रांना विसरता येणार नाही.
प्रश्न- खरेच आहे ग बाई मुंबई. तू महान आहेस.
मुंबई- मुला, तुला ठाऊक आहे, बाबासाहेब गेले ना तेव्हा वाटले होते, की आता असा दुसरा अविस्मरणिय सुपुत्र माझ्या वाट्याला येणार नाही. पण त्यानंतर लहानमोठे अनेक कर्तबगार माझ्या कुशीत आले, ममतेने मी त्यांचा संभाळ केला. त्यांच्या कर्तबगारीकडे कौतुकाने बघत राहिले. शिवसेना स्थापन झाली तेव्हा ह्याच बाळाच्या खोडकरपणाच्या अनेक तक्रारी मला ऐकून घ्याव्या लागल्या होत्या. आज तो जुना काळ मागे वळून बघताना डोळ्यात अश्रू दाटुन येतात. तीनचार दशकांपुर्वीचा तोच खोडकर बाळ आज बाळासाहेब म्हणून जगाचे डोळे दिपवून अंतर्धान पावला आहे. जसे बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर उर भरून आले होते, तसेच आज झाले आहे.
प्रश्न- म्हणजे स्मारक नको आहे तुला साहेबांचे?
मुंबई- स्मारक कोणी नको म्हटले? माझे हे असे गुणी सुपुत्र स्मारकासाठी लाचार नाहीत, एवढेच मला त्या भांडणार्‍यांना सांगायचे आहे. पण ऐकतो कोण या मुंबईचे हल्ली? जो तो आपल्याच तोर्‍यात व मस्तीत असतो ना?






सौजन्य
दै ‘आपलं महानगर’  रविवार दि. २५ नोव्हेंबर २०१२
न घेतलेल्या मुलाखती, -विक्रम महिमानगडकर

==================================

स्मारकाविषयी इतर मागण्या व विचार पुढीलप्रमाणे आहेत

विविध राजकीय पक्ष , शिवसेनेकडून आलेल्या सूचना :-
* शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांचे स्मारक बांधा - मनोहर जोशी , शिवसेना नेते
* मुंबई - गोवा कोस्टल माहामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्या . - यशोधर फणसे , नगरसेवक ( शिवसेना )
* दक्षिण मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला बाळासाहेबांचे नाव द्या . - रमेश कोरगावकर , नगरसेवक , ( शिवसेना )
* शालेय पुस्तकांमध्ये बाळासाहेबांवरील धड्याचा समावेश करा . - राजू पेडणेकर , नगरसेवक ( शिवसेना )
* बाळासाहेबांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय संग्रहालय बांधा . - शिवसेना
महापालिकेच्या मुख्यालयाजवळ बाळासाहेबांचा पुतळा उभारा . - शिवसेना
* महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यात यावे . - छगन भुजबळ , सार्वजनिक बांधकाम मंत्री
* मुंबईतील महापालिकांच्या शाळेत बाळासाहेबांच्या नावे वर्त्कृत्व स्पर्धा सुरू करा . - चेतन कदम , नगरसेवक ( मनसे )
* मुंबईतील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या दादर रेल्वे स्थानकालाच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या . - नयना सेठ , नगरसेविका ( काँग्रेस )
* इंदू मिलच्या विस्तृत अशा १२ एकर जागेवर बाळासाहेबांच्या आठवणींशी संबंधित संग्रहालय बांधा . - सुनील मोरे , नगरसेवक ( काँग्रेस )
* नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेबांचे नाव द्या . - दिलीप पटेल , भाजप .
* पुण्यात बाळासाहेबांचे स्मारक व्हावे . - मंगेश तेंडुलकर , साहित्यिक
* ठाणे , औरंगाबाद , अहमदनगर महापालिकांमध्ये बाळासाहेबांचे पुतळे उभारण्यास संमती .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा