बुधवार, ५ डिसेंबर, २०१२

आनंदाचा ‘राजा’ आंबेडकर




  काल बुधवारी परदेशी गुंतवणुकीची चर्चा संसदेत चालू व्हायची असताना मायावती यांच्या पुढाकाराने राज्यसभेत जो गोंधळ घालण्यात आला तो पाहिला मग आजच्या आंबेडकरी चलवळीप्रमाणेच एकूण दलित चळवळींची दिशा कुठे भरकटली आहे; त्याचा अंदाज येऊ शकतो. उत्तरप्रदेशात आपली अबाधित पाच वर्ष सत्ता असताना मायवतींनी शेकडो स्मारके उभी करण्याचा सपाटा लावला होता. त्यात त्यांनी बाबासाहेबांचा आडोसा घेऊन प्रत्यक्षात सरकारी खर्चाने स्वत:चीच स्मारके उभी करून घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना आपली सत्ता गमवावी लागली. कारण दलितांच्या कल्याण व उद्धाराच्या वल्गना करीत त्यांनी स्वत;ची संपत्ती वाढवलीच. पण स्वत:चीच स्मारकेही उभी करून घेतली. म्हणजेच अन्य राजकीय पक्षांपेक्षा आंबेडकरी विचारांचे झेंडे खांद्यावर घेतलेलेही कसे आपलीच तुंबडी भरताना दलिताला विसरतात, त्याचा उत्तम नमूना त्यांनी पेश केला. पण त्याचवेळी जेव्हा जेव्हा युपीए सरकारला अडचण भासली; तेव्हा आपली संसदेतील ताकद त्या सरकारच्या मागे उभी करताना, मायावतींना मुंबईतील बाबासाहेबांचे स्मारक किंवा इंदू मिलच्या जागेचे एकदाही स्मरण झाले नव्हते. त्या सौदेबाजीमध्ये त्यांनी युपीएची अडवणूक केली असती; तर हे काम कधीच होऊन गेले असते. पण स्वत:ला सीबीआयच्या तावडीतून सोडवण्यापेक्षा मायावतींची संसदेतील ताकद कधी आंबेडकर विचारांसाठी वापरली गेल्याचे दिसले नाही. मात्र आता सरकार इंदू मिलच्या विषयात अंतिम निर्णय घेणार असे स्पष्ट झाल्यावर; मायावतीही त्या गर्दीत घुसल्या आणि महाराष्ट्रातील आंबेडकरी संघटनांप्रमाणे त्यांनीही श्रेय मिळवण्याची कसरत केली. इकडे गेले काही दिवस त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू होतीच.

   गेले वर्षभर इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मिळाली पाहिजे म्हणून सगळेच रिपब्लिकन गट व पक्ष आवाज उठवत होते. पण ही मागणी इतकी वर्षे जुनी असताना, अचानक गेल्या एकाच वर्षात त्यासाठी सर्वांनी आटापिटा कशाला सुरू केला? दरवर्षी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी जी अलोट गर्दी शिवाजीपार्क दादर येथे चैत्यभूमीवर जमा होते, तिच्यासमोर आपले चेहरे पेश करायला धावपळ करणार्‍या या नेत्यांनी मागल्या किती वर्षात जरा पलिकडे जाऊन इंदू मिलचे दार ठोठावले होते? कोणी तिकडे फ़िरकला सुद्धा नव्हता. एका तरूणाने गेल्या वर्षी आजच्याच दिवशी ती मजल मारली आणि या स्मारकाचा व त्यासाठीच्या जमीनीचा विषय एकदम ऐरणीवर आला. आज त्याची कोणाला आठवण तरी आहे काय? त्याचे नाव आनंदराज आंबेडकर. म्हणजे बाबासाहेबांचा धाकटा नातू. सहसा कोणी कधी ऐकली नसेल अशी त्याची संघटना आहे, रिपब्लिकन सेना. त्याच सेनेच्या कार्यकर्त्यांनी गतवर्षी गनिमी कावा करून इंदू मिलवर बाबासाहेबांच्या स्मारकाचा ध्वज फ़डकावला होता. सगळे नेते शिवाजीपार्क व चैत्यभूमीवर गर्दीला आपले मुखवटे दाखवत असताना; गर्दीकडे पाठ फ़िरवून आनंदराज व त्यांच्या सहकार्‍यांनी थेट बाजूला ओसाड पडलेल्या इंदू मिलकडे मोर्चा वळवला आणि तिथे घुसून कब्जा केला. त्याचा गवगवा झाल्यावर भीमसैनिकांची गर्दी तिथे लोटली. मग त्यांना पोलिस लावून आवरणे शक्य नव्हते. आणि आनंदराजच्या पाठीराख्यांनी नुसता देखावा उभा केला नाही. त्यांनी ६ डिसेंबर उलटला तरी तिथेच ठाण मांडून सरकारकडून जमीन देणार असल्याचे वदवून घेतले. आम्हाला त्याचे कौतूक एवढ्यासाठीच आहे, की या मुलाने आपल्या पित्याचा खरा वारसा चालविला आहे.

   आनंदराज आंबेडकर हे नाव फ़ारसे लोकांना ठाऊक नाही. याचे कारण हा तरूण गाजावाजा न करता भरकटलेल्या आंबेडकरी चळवळीला मार्गावर आणायची एकाकी लढाई लढतो आहे आणि त्यात त्याने प्रसिद्धीपेक्षा लोकांमध्ये राहून काम चालविले आहे. त्यामुळेच पत्रके काढणे वा चर्चासत्रे भरवून जनमानसात आपली उंच प्रतिमा उभी करणे; यापासून तो दूर असतो. आणि त्याचा संयमी ध्येयवादी पिताही तसाच होता. त्यांचे नाव भय्यासाहेब आंबेडकर. ज्याला आज चळवळीत सूर्यपुत्र म्हणून ओळखले जाते. त्यांनी पित्याच्या निर्वाणानंतर त्यांचा राजकीय वारसा मिळवण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करायची अखंड धडपड केली. मुंबईतला बाबासाहेबांचा पहिलाच भव्य पुतळा उभारण्यातही अशी टाळाटाळ व अडवणूक झाली होती. पण भय्यासाहेबांच्या अथक व संयमी प्रयत्नांमुळेच ते स्मारक २६ जानेवारी १९९६२ रोजी ओव्हल मैदानाजवळ उभे राहिले. त्याचेही श्रेय घ्यायला आजच्या सारखीच झुंबड उडाली होती. पण त्याकडे पाठ फ़िरवून भय्यासाहेबांनी पित्याचा वैचारिक वारसा मोठा मानला आणि आता त्याच भय्यासाहेबांच्या धाकट्या पुत्राने संयमी, पण नेमक्या कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा मार्ग खुला करून दिला आहे. त्यांनी गतवर्षी गनिमी कावा केला नसता तर वर्षभरात हा विषय तडीस लागला नसता. प्रसिद्धीपेक्षा कामावर लक्ष देऊन खर्‍या निष्ठावान आंबेडकरवाद्यांना सोबत घेत, सौदेबाजीपासून दुर असलेल्यांची संघटना उभी करण्याचे आनंदराज यांचे मूळ काम चालू होते; म्हणूनच त्यांना हे यश मिळाले आहे. त्यांनी ऐक्याचे वा एकजुटीचे नारे न लावता, सर्वांना एकत्र यायला भाग पडेल; अशी पावले उचलून हे शक्य करून दाखवले आहे. म्हणूनच आम्हाला वाटते, आजच्या आनंदाचा खरा ‘राजा’ तोच आंबेडकर आहे ज्याचे नाव आनंदराज आंबेडकर आहे. ज्याप्रकारे त्या तरूण नेत्याने स्मारकाच्या विषयाला नेमकी दिशा मिळवून दिली, त्याच प्रकारे त्याने अथक प्रयत्नातून सत्तेच्या सापळ्यात अडकलेली दलित आंबेडकरी चळवळही योग्य दिशेने मार्गावर आणावी; एवढीच त्याच्याकडून आजच्या मुहूर्तावर अपेक्षा. कारण तीच बाबासाहेबांसाठी खरी श्रद्धांजली असेल.

दै. ‘आपलं महानगर’ मुंबई महापरिनिर्वाणदिन ६ डिसेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा